आठवणीतल्या गोष्टी
आठवणीतल्या गोष्टी
नुकताच एका परीसंवादात भाग घेण्याचा योग आला . मुलांवर कसे उत्तम संस्कार होतील आणि त्यात बालकथांचा सहभाग किती हा ह्या परीसंवादाचा विषय होता.
त्यानिमित्ताने बालपणी ऐकलेल्या व वाचलेल्या अनेक रम्य कथा स्मृतीपटलावर आल्या.
अगदी न कळत्या वयात टोपीविक्या आणि माकडांची गोष्ट बाईंच्या तोंडून ऐकताना खूप मजा वाटत असे. बाई अशा गोष्टींवर छान नाटुकलीही बसवत असत. त्याच वयात वाचलेला लाकूडतोड्या त्या अजाणत्या वयातही प्रामाणिकपणाचे धडे देऊन गेला. चल रे भोपळ्या म्हणत भोपळ्याला टुणूक टुणूक चालवणारी ती चाणाक्ष म्हातारी आणि तीचा तो गोलमटोल भोपळा !! आजही पुस्तकातलं ते चित्र जसंच्या तसं डोळ्यापुढे तरळतंय् !
लहानपणी आजी आम्हाला शूर शिवाजीच्या गोष्टी सांगत असे. शिवाजीच्या गोष्टी ऐकून अंगात जणू वीरश्रीच संचारायची आणि मग आमचे लुटूपुटूचे तलवारबाजीचे खेळ रंगत. घरातल्या जुन्या वह्यांचे पुठ्ठे काढून त्यांच्या तलवारी वाड्यातलाच एखादा दादा बनवून देई ; आणि मग त्याच तलवारी हाती घेऊन आमचे गनिमी कावे रंगत .
आजोबांकडे धार्मिक गोष्टींचा खजिनाच होता. ते आम्हाला रामायण , महाभारतातल्या गोष्टी सांगत. सहज म्हणून सांगितलेल्या त्या गोष्टी आमच्यावर भूतदया , बंधुभावाचे संस्कार करत गेल्या. सहिष्णुता , भक्तीभाव ह्रदयात जागवत गेल्या..
आई मात्र बुड बुड घागरी , ससुल्या , अस्वल्याच्या गोष्टी सांगून खरे बोलावे , चोरी करू नये , प्राणीमात्रांवर प्रेम करावे वगैरे संस्कारांची बीजे रुजवत असे.
बालपणीच्या त्या सुखावह काळात दूरदर्शन ने आमच्या बालमनाचा ताबा घेतला नव्हता. पोकेमाॅन , शिनचान ,डोरेमाॅन वगैरेंचे हिंदुस्तानी बालमनांवर आक्रमण झाले नव्हते , असा तो काळ होता . कदाचित् म्हणूनच त्या उमलत्या वयात पुस्तके वाचण्याची गोडी लागली , जी आजही टिकून आहे.
त्यावेळी "चांदोबा" नावाचे एक पाक्षिक बालदोस्तांमध्ये खूपच लोकप्रिय होते. रंगीत गुलाबी मुखपृष्ठाने नटलेला तो "चांदोबा"मिळवण्यासाठी नाक्यावरच्या पेपरवाल्या काकांना आधीपासून सांगून ठेवावं लागे. चांदोबामधली "विक्रम आणि वेताळ"ची गोष्ट त्यावेळेला बच्चे कंपनीमध्ये खूपच लोकप्रिय होती. अंधार्या रात्री जराही न घाबरता जंगलात जाऊन झाडावरून वेताळाला खांद्यावर घेणारा तो विक्रमादित्य राजा अत्यंत कल्पकतेने वेताळाच्या प्रश्नांची उत्तरे देऊन स्वतःची सुटका करून घेत असे. प्रत्येक भागात उत्तरोत्तर रंगत जाणारी ही कथा मुले आवडीने वाचत. रात्रीच्या नीरव शांततेत मात्र झाडांच्या पानांची सळसळ झाली तरी झाडावर वेताळ असेल की काय ह्या भितीने आम्ही आईच्या कुशीत शिरत असू !
असेच एक आनंद नावाचे मासिकही मुले आवडीने वाचत.
त्याचप्रमाणे "किशोर" नावाचे एक मासिक त्यावेळी किशोरवयीन मुलांच्यात लोकप्रिय होते. त्यात सुरेख गोष्टी आणि चित्रकला , हस्तकला व बुद्धीला चालना देणारी कोडी असत.
मुलांचे भावविश्व व्यापून टाकणारी अनेक परिकथा व इतर बालकथांची पुस्तके त्यावेळेला उपलब्ध असत व त्यांची विक्रमी विक्री होई . सिंदबादच्या सात सफरी , गुलबकावली , हिमगौरी ही त्यापैकीच काही वाचकप्रिय पुस्तके. तसेच बाटलीतला राक्षस , जादूची काडी फिरवणार्या त्या पर्या ! अहाहा ! त्या निरागस बालपणीचा तो रम्य काळ ! अलिबाबाची गुहा आणि 'खुल जा सिमसिम' ह्या परवलीच्या शब्दांनी तर बालविश्व व्यापून टाकले होते.
कुमारवयात पदार्पण करताना हाती पडलेल्या भा. रा. भागवतांच्या फास्टर फेणे ने तर तोंडाने "ट्टाॅक" आवाज काढत धम्मालच उडवून दिली आणि कुमारवयीन मुलांचा तो हिरो बनला . सिन्ड्रेला , झोपलेली राजकन्या सारख्या गोष्टी आपल्याही आयुष्यात कोणीतरी परीकथेतील राजकुमार येणार आहे ह्याची हळूच जाणीव करून देऊ लागल्या आणि आपण मोठे झालोय हे उमजायला लागलं.
नेमका ह्याच काळात दूरदर्शन ने ही आपला सोनेरी विळखा पसरायला सुरुवात केली आणि बालकथा हळूहळू विस्मरणात जाऊ लागल्या , पण मनावर संस्काराच्या डौलदार भिंती बांधूनच !
स्वाती सुबोध शृंगारपुरे
बोरीवली , मुंबई

आता तर मोबाईल फोन,गेम हेच मुलांना आवडते
ReplyDelete