विनोदकाका

*स्वातीचे शब्दमोती*

( वडीलांचे मित्र श्री. विनोदबापू कर्णिक ह्यांच्या निधनानंतर व्यक्त केलेल्या अंतःकरणातील भावना )

विनोदकाका....

     शुक्रवारी भल्या पहाटे फोन खणखणला आणि "शैलेष कर्णिक" ही अक्षरं स्क्रीनवर झळकली. चांगलं/वाईट काहीही घडलं की पहिला फोन ताईला म्हणजे मला करायची शैलेषची नेहमीचीच सवय. आज नक्कीच काहीतरी अघटीत घडलंय् हे त्याच्या "हॅलो"ह्या कातर स्वरांनीच सांगितलं आणि काळजात चर्र झालं . शंकेची पाल चुकचुकली. ही शंकेची पाल मोठी वाईट असते काका ! नको असताना मनात येणा-या शंका ही सहजतेने ख-या ठरवते आणि स्वतःचा पालीचा जन्म सार्थकी लावते.
     तर.. तेच घडलं ! चुकचुकणा-या पालीने डाव साधला. " विनोदकाका गेले" एवढंच बोलून शैलेषने फोन कट केला. त्याच्या डोळ्यात साठलेलं आभाळ मला माझ्या घरात जाणवलं.  नक्कीच  त्यालाही आठवले असाल त्याच्या वाढदिवसाला धडपडत आशिर्वाद द्यायला घरी येणारे तुम्ही ! आईबाबा दोघेही नाहीत ह्यावर्षी आशिर्वाद द्यायला   ही जाणीव मोडीत काढणारे तुम्ही !
     पहाटेची रम्य वेळ अचानक काळरात्र भासू लागली. मन टाहो फोडू लागलं. विनोदकाका... त्या क्षणाला तुमची प्रत्येक आठवण डोळ्यासमोरून सरकू लागली.
     प्रथम कधी पाहीलं तुम्हाला , कधी ओळख झाली , कधी ऋणानुबंध जुळले आणि ते कधी दृढ झाले.... काहीच आठवत नाही.
     समजतही नव्हतं काही ,  त्या वयात एकच गोष्ट समजत होती. विनोदकाका म्हणजे माझ्या परमप्रिय बाबांचे परमप्रिय मित्र , बालपणापासूनचे सांगाती ,  सोबती ! बाबांच आणि तुमचं अतूट मैत्र त्या नकळत्या वयातही जाणवायचं. दोघांकडूनही त्यांच्या बालपणीच्या गोष्टी ऐकायला खूप गंमत वाटायची. त्यातून "डहाणू" समजायला लागलं ,  दौणे हा परवलीचा शब्द समजला आणि खास आपला डहाणूकर कुटुंबियांचा जणू अनभिषिक्त हक्क असलेले काही शब्दही मनाची डिक्शनरी भरत गेले ! त्यातून जाणवायचा दोन मित्रांचा एकमेकांविषयीचा जिव्हाळा ,  आपुलकी , प्रेम आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्याचा दुर्दम्य आशावाद !  डहाणूची ओढ ,  आयुष्याच्या शेवटापर्यन्त डहाणूशी घट्ट जोडलेली तुमची नाळ आणि भेटीची दोघा मित्रांच्या ठायी कायम असलेली ओढ .
     विनोदकाका.. आत्तापर्यन्त तुम्हाला भेटण्याचा अनेकवेळा योग आला. दरवेळेस जाणवली ती आम्हा दोघा भावंडांबद्दल तुमच्या मनात असलेली अपार माया !
     बाबा गेल्यानंतर तुम्ही बाबांची उणीव भरून काढलीत. येत राहीलात घरी ,  फोनवर बोलत राहीलात, स्वतःलाही समजवलंत आणि आमच्यावर मायेची सावली धरलीत. तुमच्यावरही आघात झालाच होता बाबांच्या अचानक जाण्याने ! दोन दिवसापूर्वीच घरी येऊन खूप गप्पा मारून गेला होतात बाबांशी.. आणखी दोन दिवसानंतर आपला हा बालमित्र जग सोडून जाणार ह्याची सुतराम कल्पनाही नव्हती तुम्हाला ! बालपणापासूनचे जीवलग मित्र तुम्ही दोघे ! तरीही तुम्ही स्वतःचं मन आवरलंत आणि आम्हाला सावरलंत. आईला धीर दिलात. तुमचा कणखरपणा तेव्हा प्रकर्षाने जाणवला.
     बाबांच्या पाठोपाठ काकीच्याही निघून जाण्याने तुम्ही जीवनसाथी गमावलीत. तरीही त्यातून खंबीरपणे उभे राहिलात. जणू दुःखानेही हार मानावी अशी खंबिरता जाणवली त्याकाळात.
     तुम्हाला आठवतं विनोदकाका ?? माझी आई गेली त्यादिवशी खूप पोरकेपणाची भावना निर्माण झाली होती माझ्या मनात. 'बाबा आणि आई दोघेही गेले , आम्ही पोरके झालो' असं जेव्हा मी तुम्हाला म्हंटलं ,  तेव्हा आवेगानं जवळ घेतलंत मला. काहीच बोलला नाहीत तुम्ही त्या क्षणाला. पण तुमचा आश्वासक स्पर्श जणू सांगत होता "बेटा ,  मी आहे ना !" आणि तोच स्पर्श बळ देत होता दुःखातून सावरायला....
     आता कोण सावरणार काका ?? आम्ही सर्वचजण पोरके झालोय् ! डहाणूला घट्ट जोडणारी नाळच खुडली गेलीये जणू !
    माझ्या प्रत्येक यशानंतर आवर्जून येणारा तुमचा फोन आता कधीच येणार नाहीये..... माझी कविता , लेख कुठेही छापून आले की  माझ्याही आधी तुम्हाला येणारी माझ्या बाबांची आठवण ! "बेटा ,  आज दत्ता असता तर स्वतः पेपर घेऊन सकाळीच माझ्या घरी हजर झाला असता ; म्हणाला असता , बघ आपल्या स्वातीने किती सुंदर लिहीलंय् , पेपरमध्ये छापून आलंय् !" हे तुमचे शब्द आणि "आपल्या" स्वातीने ह्यातून जाणवणारा तो "आपले"पणा !  ह्यातलं काहीच आता मिळणार नाहीये. तरीही जन्मभर जपून ठेवीन पाठीवरची तुमची कौतुकाची थाप आणि तुमचे आशिर्वाद !
     तुम्ही गेलात असं मानणारच नाही कधी ! जिवंत आहात तुम्ही माझ्या ह्रदयात , प्रत्येक डहाणूकर कुटुंबियांच्या ह्रदयात ! तुमची उणीव कधीच भरून निघणार नाही. प्रत्येक दहीहंडी उत्सवात आठवत राहतील भर पावसात नाचतगात कृष्णजन्माचा जल्लोष करणारे , पूर्वजांची परंपरा जपणारे विनोदकाका ! आठवत राहतील सर्वांना भजनं बोलता यावीत म्हणून स्वतः पुस्तक छापणारे , रामनवमीला भजनात तल्लिन होऊन टाळ वाजवणारे विनोदकाका ! आठवत राहतील प्रचंड मेहनत घेऊन वंशावळ लिहीणारे विनोदकाका ! आठवत राहतील डहाणूच्या गोष्टी सांगून आमच्या मनात डहाणूची ओढ कायम राखणारे विनोदकाका ! किती किती म्हणून आठवणी सांगू ?? सारंच संपलंय् आता !
     पण हे संपलं तरी कसं म्हणू ? हे रेशिमबंध आहेत. मुलायम ,  नाजूक तरीही अतूट ! नात्यांची वीण घट्ट करणारे हे रेशिमधागे तुम्ही नसतानाही गुंफून ठेवतील आम्हा कुटुंबियांचे हातात हात !  तुम्हीच निर्माण केलेली डहाणूची ओढ कायम तेवत ठेवील आमच्या ह्रदयातील संस्कारांचे नंदादीप ! मन ओढ घेईल डहाणूकडे ,  तेव्हा जाणवेल डहाणूच्या मातीतील एक अनामिक भारलेला  गंध ; जो स्मरण करून देईल की ह्याच मातीला झाला आहे तुमचा पदस्पर्श ! ह्याच मातीत रुजला आहे आणि शेवटच्या श्वासापर्यन्त ह्याच मातीसाठी झिजला आहे
" विनोदबापू" नावाचा एक दीपस्तंभ ! 
     हो ! दीपस्तंभच म्हणावं लागेल . वादळात , तुफानात ,  झंझावातातही जो कणखरपणे उभा राहतो ,  कुटुंबियांवर मायेची पखरण घालतो तो दीपस्तंभ !
     "बेटा" ही प्रेमळ हाक आता कधीच ऐकू येणार नाही ; पण तो अपार मायेने ओथंबलेला स्वर जागृत राहील आमच्यापैकी प्रत्येकाच्या कानात आणि मनात ! तोच स्वर बळ देईल आम्हाला आमच्या जगण्यासाठी ,  फुलण्यासाठी आणि आमच्या मुलाबाळांच्या उमलण्यासाठी !
     तुम्ही गेला नाहीत विनोदकाका ; गेला तो तुमचा देह ! पण तुम्ही सतत जागृत रहाल प्रत्येक डहाणूकर कुटुंबियांच्या ह्रदयात ! प्रेरणा देत राहील तुमची शिकवण. स्मरणात राहतील  कळतनकळत सर्वांच्या मनावर तुम्ही केलेले संस्कार आणि तेच तरून नेतील आम्हाला ह्या खडतर जीवनमार्गातून यशस्वी वाटचाल करण्यासाठी !


भावपूर्ण आदरांजली

Comments

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं