पु.ल.

मंडळी ,
     अखिल महाराष्ट्रालाच नव्हे,तर जगभरातील मराठी वाचकप्रेमींना वेड लावणा-या पु.लं.ची आज जयंती.
     मला आठवतात कुमारवयातून तरुणवयात पदार्पण करत असतानाचे माझे मोरपंखी दिवस. किशोरवयात असताना लागलेली वाचनाची गोडी कुमारवयात फुलू लागली आणि तरुण वयात तर वाचनाचं अक्षरशः वेड लागलं. "बालभारती" , "कुमारभारती" आणि त्यापाठोपाठ डेरेदाखल झालेल्या "युवकभारती"ने करून दिलेली नावाजलेल्या साहित्यिकांची ओळख मनात रुंजी घालत असे आणि त्यांचं साहित्य वाचण्याची ओढ लागे.
     अशा  उमलत्या वयातच हाती लागली पु.लं.ची पुस्तकं आणि मग काय ! व्यक्ती आणि वल्ली ,  बटाट्याची चाळ , पूर्वरंग , अपूर्वाई , खोगिरभरती....  एक ना दोन ! अक्षरशः फडशा पाडला त्यांच्या पुस्तकांचा !
     व्यक्ती आणि वल्लीमधल्या वल्लीमधल्या वल्ली आपल्याच अवतीभवती वावरणा-या वाटतील इतक्या पु.लं.नी जीवंत केल्या. पु.लं.ची बटाट्याची चाळ जणू माझीच चाळ आणि अपूर्वाईसारखी प्रवासवर्णनं त्यांच्यासोबत मलाही देशविदेशाची सफर घडवून आणित.
दूरदर्शन ने ह्याच काळात हातपाय पसरायला सुरुवात केली आणि गुळाचा गणपती , देवबाप्पा सारखे पु.लं.नी अभिनय , दिग्दर्शन केलेले चित्रपट काळ्यापांढ-या पडद्यावर झळकले. पु.लं.च्या अभिनयाची चुणूकही अनुभवता आली. मला आठवतं 'वा-यावरची वरात'चा काही भाग दूरदर्शनवर दाखविण्यात आला होता. आणि  आबालवृद्ध तो अक्षरशः डोळ्यात साठवून घेत होते !  यू ट्यूबवर पुन्हा पुन्हा पाहण्याची सुविधा त्याकाळी उपलब्ध नव्हती.
     ह्याच काळात हाती चार पैसे खुळखुळू लागले आणि नाटक पाहण्याची चटक लागली. तुझे आहे तुजपाशी , फुलराणी सारखी पु.लं.ची नाटके पुन्हा पुन्हा पाहिली .
     मराठी सारस्वताच्या दरबारातील ह्या अनभिषिक्त सम्राटाने माझं साहित्यविश्व समृद्ध  केलं. पु.लं.ची विनोदबुद्धी आणि त्यांचा हजरजबाबीपणा वाखाणण्याजोगा होता. 
     पु.लं.ना प्रत्यक्ष भेटण्याचा कधी योग आला नाही. पण वैयक्तिक जीवनात पु.ल. कसे आहेत हे जाणून घेण्याच्या ओढीने मी सुनिताताईंची काही पुस्तके व लेख त्याकाळात वाचले आणि पु.लं.बद्दलचा आदर दुणावला.
    माझ्यासारख्या सामान्य वाचकाला पु.लं.नी खूप हसवले ,  हसता हसता अंतर्मुखही केले. आमची पिढी खूप काही शिकली त्यांच्याकडून ;  खूप काही मुकलोही असू कदाचित् ! पण मनाचा एक कोपरा व्यापून आहेत आजही पु.ल. ,  पु.ल. , आणि फक्त पु. ल. !

Comments

  1. सुरेख स्वाती

    ReplyDelete
  2. खरंच सुरेख स्वाती..

    ReplyDelete
  3. स्वाती खूप छान लिहिलंयस. पुलं ची पुस्तकं वाचूनच आपण मोठे झालो. आताही त्यांची पुस्तक वाचन तोच आनंद मिळतो .
    स्वाती तुझ्या ब्लॉगसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद संगितिका...

      Delete
  4. स्वाती ,पुलंबद्दलचा अप्रतिम लेख वाचला.तू तर सगळं माझ्याच मनातलं लिहीलंय असंच वाटलं आणि पुलंच्या प्रत्येक चाहत्याला असंच वाटेल. खूप खूपच आवडला तुझा लेखतुझ्या लेखामधे पुलंची सगळी वैशिष्ट्ये,पुलंचे सगळे गुण सामावले आहेत. प्रत्येक पुलंप्रेमी तुला नक्कीच धन्यवाद देईल.
    -----------------चित्रे मावशी

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कथा - आनंदाचे डोही

आषाढस्य प्रथम दिवसे

विनोदी कविता - एकदा काय झालं