बालभारती अभ्यासलेल्या प्रत्येकासाठी

*स्वातीचे शब्दमोती*

*बालभारती अभ्यासलेल्या प्रत्येकासाठी....*

वर्तमानपत्र उघडलं तर त्यात बातमी दिसली. बालभारती पन्नास वर्षांची झाली म्हणे!  सोबत बालभारतीच्या मुखपृष्ठावरचा तो दोन मुलांचा गोजिरवाणा फोटो ,  चित्रकाराने अचूक रेखाटलेली त्यांच्या बोलक्या डोळ्यातली बालभारती वाचण्याची ती उत्सुकता ,  आणि ती गोल वळणदार अक्षरे,  "बालभारती " !
    तो फोटो पाहून मी भूतकाळात कधी शिरले , माझं मलाच समजलं नाही. मनःपटलावर तरळली ती आठवणीतली शाळा आणि शाळेतल्या अभ्यासात सर्वांत जास्त आवडणारं ते बालभारती पुस्तक ! जून महिन्यात शाळा उघडल्यावर सर्वात प्रथम हवंसं वाटायचं ते बालभारती .
    बालभारतीच्या मुखपृष्ठावरची ती निरागस मुले जणू आम्हीच होतो की ! अजूनही आठवतो तो नव्याको-या पुस्तकांचा श्वासात साठवलेला गंध आणि पुस्तकाला कव्हर घातल्यानंतरही हळूच कव्हर थोडं सरकवून पहावीशी वाटणारी ती गोडुली मुले !
    बालभारती म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा सांगाती , सोबती , सखा . हवंहवंसं वाटायचं त्यातलं प्रत्येक पान .  मायमराठीची खरी ओळख बालभारतीनेच करून दिली. त्यातल्या कथा , कविता वाचून उमलत्या वयात मनाचे गाभारे प्रगल्भ होत गेले. साहित्यिकांशी परिचय ह्याच बालभारतीने करून दिला. त्यांची लेखनशैली समजू लागली. शब्दांशी खेळत कविता करायला पण ह्याच बालभारतीने प्रेरणा दिली.
     बालभारतीतल्या अनेक कथा आणि कविता त्या अजाणत्या वयात आमच्याही नकळत आमच्यावर संस्कार करत गेल्या . कवितांना सुरेख चाली लावून बाई त्या कविता शिकवू लागल्या की त्यांची गाणी होत आणि मराठीचा तास त्या सूरगंगेत न्हाऊन निघे.
    बालभारतीतल्या गोष्टींनी शहरी विद्यार्थ्यांची नाळ ग्रामिण संस्कृतीशी घट्ट बांधून ठेवली ; तर ग्रामिण विद्यार्थ्यांना शहरी झगमगाटाची ओळखही बालभारतीनेच करून दिली. ह्याच बालभारतीने ज्ञानोबा , तुकोबांच्या भक्तिरसात सचैल स्नान घडवले तर शिवबा , झाशीची राणी ह्यांच्या शौर्यगाथांनी बालह्रदयात वीरश्रीची ज्योत जागवली.
    स्वातंत्र्यवीरांच्या वीरकथांनी देशप्रेमाच्या जाणिवा जाग्या केल्या. मोठमोठ्या गणितज्ञ आणि शास्त्रज्ञांच्या गोष्टीही ह्याच बालभारतीने मुलांना सांगितल्या आणि मुलांच्या उज्वल भविष्याचे ज्ञानदीप लावले.
   आता काळ बदलला ,  अभिरुची बदलली , जीवनशैली बदलली ,  बहुतांश प्रमाणात शिक्षणाचं माध्यमही बदललं. तरीही बालभारती प्रत्येकाच्या मनात जागृत आहे. बालभारतीच्या संस्कारांवर उभारलेल्या भावी आयुष्याच्या डौलदार भिंती आज दिमाखात उभ्या आहेत. आजही मुखपृष्ठावरची ती गोड मुले आपल्या मनातलं बालपण जपतात. आपल्यातही एक लहान मूल दडलंय् ही जाणिव जागृत ठेवतात.
    अशा आपल्या रम्य बालपणीची आठवण आपल्या सर्वांच्या मनात अलवार जपणा-या बालभारतीला आणि कधीच मोठे न होणा-या मुखपृष्ठावरच्या त्या चिमुरड्यांना त्यांच्या पन्नास  वर्षाच्या लोकप्रिय वाटचालीबद्दल हार्दिक शुभेच्छा !

Comments